मराठी माणसाचे मराठीपण हरवत चालले आहे का ?
:- राजेंद्र गाडगीळ
इ. स. १९२० साली नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता.लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते.स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला.या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.त्यामुळे आपण १ मे महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो.याच १ मे रोजी दरवर्षी जगभर कामगार दिन साजरा होतो.संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी झाली ती कामगरा वर्गांमुळे आणि कामगार चळवळीमुळेच हे विसरून चालणार नाही.
आज संयुक्त महाराष्ट्रची स्थापना होऊन ६५ वर्ष होत आहेत. पण मुख्यपणे १९७० च्या दशकानंतर महाराष्ट्रातील सत्ताधार्यांनी राजकीय,सामाजिक,आर्थिक,न्यायिक,कायदा,सुव्यवस्था,संस्कृती व्यवस्थेची जी हेळसांड केली त्यातून मराठी माणसाची आर्थिक सत्ता कमजोर झाली.राजकारण समाज हितासाठी याचा विसर पडला व व्यक्तीगत हितासाठी राजकारण हे सूत्र स्वीकारले गेले त्यामुळे मुंबई महाराष्ट्रची राजधानी आणि आर्थिक राजधानी असून सुद्धा मुंबईवरची व त्यामुळे महाराष्ट्रवरची मराठी सत्ताधारी वर्गाची पकड ढिली झाली.मराठी सत्ता,प्राबल्य पूर्ण ल्यायला गेली आहे.इतिहासाचे नीट अवलोकन केल्यास १९७०च्या दशकापासून मराठी माणसाचा ऱ्हास सुरू झाला.विकास साधण्याची दृष्टी संपुष्टात आली.
त्यामुळे प्रकर्षाने अनेक समाज चिंतक,विचारवंत लोक मुंबईतील व महाराष्ट्रातील मराठी माणूस सत्वहीन झाला आहे,मराठी माणसात मराठीपण टिकून नाही,मराठी माणसाची ओळख आज हरवलेली आहे,मराठी माणूस आपली सामाजिक बांधिलकी विसरून आतममग्न झाला आहे,त्याची विकासाची आस उमेद विझली आहे अशी चिंता व्यक्त करत असतात. प्रत्येकजण आपल्या परीने त्याच्या कारणांची मीमांसा करीत आहे.
मी १९७० साला पासून सामाजिक चळवळीत असल्याने माझे अनुभव व विचार यातून त्याची मीमांसा करीत आहे.व्यक्तीची आणि समाजाची ओळख,त्याच्या संस्कृतीची छाप दोन तऱ्हेनी उमटते,एक म्हणजे अर्थसत्तेच्या मार्गाने आणि दुसरे त्या प्रदेशातील समाज किती संघटित आहे,त्यांनी कला,शास्त्र,साहित्य यात कोणते वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिले आहे त्यावरून.उदा. मुंबईचे घेऊ या. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सत्तेमुळे संपूर्ण मुंबईभर आज स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनी सुद्धा ब्रिटिश बांधकामाच्या माध्यमातून ब्रिटिश बांधकाम शैलीचे वैशिष्ट्य आजही टिकून आहे.तसेच पारशी समाजाची छाप ठळक दिसून येते.आज गुजराथी व्यापारी वरचढ असल्याने आर्थिक क्षेत्रात गुजराथी अस्मितेचे प्राबल्य दिसून येते.उत्तर भारतीय कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने मुंबईवर त्याच्या संस्कृतीची छाप उमटली आहे.
मराठी माणसांच्या मराठीपणाचा जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा मी १९८० पर्यंत साधारण कम्युनिस्ट, समाजवादी,आंबेडकरी चळवळ मुंबईत व महाराष्ट्रात आपले पाय रोवून होती.त्या चळवळीची दखल राज्यकर्त्यांना व अर्थसत्ता ज्यांच्या हाती आहे त्या वर्गाला घ्यावी लागत होती.या सर्व मानव मुक्तिच्या चळवळीमुळे मराठी माणूस संघटित होता व त्यामुळे त्याचे अस्तित्व,त्याचे सांस्कृतिक भान त्याच्या अस्मिता,त्याचे सत्व याची दखल सर्वांना घ्यावी लागत होती त्यामुळे मुंबईत व महाराष्ट्रात अगदी खोल पर्यंत मराठीपण टिकून होते.
मराठीपण म्हणा की एकूणच कोणत्याही प्रदेशाची अस्मिता ही तो किती संघटित आहे व आपण करत असलेल्या अस्तित्वाच्या,मुक्तिच्या लढाईचे परिणाम कला,शास्त्र,साहित्य,संगीत,काव्य, चित्रकला यावर किती होतो यावर ते अवलंबून असते असे माझे मत आहे. महाराष्ट्र व मुंबईचा विचार करता,जोवर मुंबईत व महाराष्टात आदिवासी,वंचित,स्त्रिया,शेतकरी,शेतमाजुर,कामगार,पांढरपेशा यांच्या चळवळी जोरात होत्या त्यामुळे ग्रामीण जीवनापासून शहरी जीवनपर्यंत मराठी संस्कृतीची छाप सर्वत्र होती व त्याची दखल भारताला व जगाला घ्यावी लागत होती.मेधा पाटकर यांच्या आंदोलनामुळे आदिवासी संघटित राहिला आणि त्याच्या चळवळीतील सहभागामुळे आपल्या संकृतीचे तो रक्षण सक्षमपणे करू शकला. विविध स्तरावर होणार्या चळवळीचे परिणाम मराठी संस्कृती सोबतच भारतीय कला,शास्त्र,साहित्य वरती झालेले दिसतात.हे झालेले परिणाम आपल्याला विचारात घेणे गरजेचे आहेत.या सर्व चळवळीचा परिणाम म्हणजे संस्कृती ठळकपणे पुढे आली.
मुख्यत: मुंबईतील कम्युनिस्ट चळवळीचा आधार हा गिरणी कामगार होता आणि गिरणीकामगार हा बहुसंख्येने मराठी कामगार होता तसंच तो महाराष्ट्रातील विदर्भ,मराठवाडा,खानदेश,नगर,नाशिक,पश्चिम महाराष्ट्र,कोकण या सर्व विभागातून आला होता.त्यामुळे मुंबईमध्ये मराठी संस्कृती,अस्मिता ठळकपणेआपले अस्तित्व टिकवून होती.विविध विभागातून आलेला कामगार आपल्या विभागातील खाद्यपदार्थ,आपली लोक संस्कृती,आपले उत्सव,सण,समारंभा,चालीरीती,आपली वेशभूषा यांचे वैशिष्ट्य जपून होता,टिकवून होता.हा कामगार आपा आपल्या विभागातील स्थानिक संस्कृती जोपासत होता त्यामुळेमुंबईत मराठी माणसाचं सांस्कृतिक संगम मुंबईत बघण्यास मिळत होता.
पण सत्ताधारी वर्गाने,सत्ताधारी पक्षाने आणि भांडवलदारांनी मुंबईतून सर्व पुरोगामी विचारांच्या चळवळी
संपवण्यासाठी चे विविध उपाय योजले त्यातून बहुसंख्य असलेला गिरणी कामगार नष्ट झाला परिणामी
मुंबईतील मराठी संस्कृतीची छाप,मराठीपण,मराठी अस्मिता नष्ट झाली. कामगार चळवळीच्या फोड झोडीमुळे मराठी माणूस सत्वहीन झाला,मराठी माणसातील मराठीपण विझले.त्यामुळे मुंबईतीलच नव्हे तर सार्या महाराष्ट्रातील मराठी अस्मिता,मराठी संस्कृतीचं वैशिष्ट्य, मराठीपण लयास गेले.
एकंदरच कम्युनिस्ट,समाजवादी,आंबेडकरी,आदिवासी,स्त्रिमुक्ती चळवळीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी
साहित्यिकांना कथा,कादंबरी,कविता,नाटक,शाहीरी,वग,शाहीरी,जलसा,पथनाट्य,चित्रपट,चित्रकला इत्यादी प्रकारच्या कला प्रकारांना साठी विषय मिळाले,समाजाशी निगडीत,व्यक्तीच्या,स्त्रियांच्या,आदिवासींच्या भावविश्वाशी निगडीत विषयांना चालना मिळाली.दाखल घेण्यास भाग पाडणारे दलित साहित्य निर्माण झाले.महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली आणि कामगार नाट्य स्पर्धा जन्माला आली.त्यामुळे मराठी व्यक्ती हा आपल्या स्व-विकासाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत होता.
मुंबईतील इप्टा सारख्या चळवळींचे परिणाम चित्रपटसृष्टीवर झाले.सामान्य जनतेचे विषय घेऊन चित्रपटांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटले.मराठी चित्रपटाचा विचार करता सामना,सिंहासन,उंबरठा ही उत्तम उदाहरणे आहेत.साहित्यामधील विषय सुद्धा हे माणुसकेंद्री झाले.विविध चळवळींमुळे मराठी संस्कृती समृद्ध,सकस झाली हे जसे म्हणता येते तसंच हिंदी साहित्य जगतावर,बॉलीवूड चित्रपटजगतावर सुद्धा परिणाम झाले.दो बिघा जमीन,जागते राहो, मदर इंडिया,प्यासा अशा किती तरी सिनेमांची नावे आपल्याला सांगता येतील.हे चित्रपट कष्टकरी केंद्री चित्रपट आहेत.गाईड चित्रपटातून स्त्रीची बंधनातून मुक्त होऊन आपल्या इच्छेनुसार जगण्याची इच्छा,आस प्रकट झाली आहे.हिंदीतील साहित्यामध्ये लोकांचे विषय असलेले सकस साहित्य व साहित्यिक तयार झाले.त्यातून राजकमल सारखे प्रकाशक निर्माण झाले.एकंदरच हिंदी नाटकांचे,चित्रपटांचे विषय कामगार,कष्टकरी,शेतकरी,स्त्रिया,स्वप्न भंगलेला मध्यमवर्ग यांच्या सुख दु:खाशी निगडीत होते.सीने गीत तर जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारे निर्माण झाले.कवी शैलेंद्र याने आपल्या चित्रपट गीतातून तत्वज्ञानातील कठीण विषय लोकभाषेत लोकांना पटेल रुचेल अशा पद्धतीने मांडले.आणि त्याची ती सर्व गाणी आजही अजरामर आहेत.
सध्या उच्च दर्जाच्या कला,शास्त्र,साहित्याची आवड नसणारी संस्कृती जन्माला येत असल्याची खंत व्यक्त होत आहे.सकस साहित्य संस्कृती म्हणजे काय हे नव्या पिढीला माहीत नसल्याची चर्चा सुरू आहे. उच्च दर्जाच्या कला,शास्त्र,साहित्याचे मापदंड विविध सामाजिक,राजकीय,संस्कृतिक चवळीतून निर्माण झालेत.जीवन म्हणजे काय? ते कशासाठी जगाचे?कसे जगाचे? याची उत्तरे,याचा शोध कला शास्त्र साहित्य घेताना दिसत होते.अगदी विज्ञानावरही कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव पडला आणि अण्वस्त्र नकोत,पुन्हा हिरोशिमा नको अशी आंदोलने जगभर उभी राहिली. यातूनच लोक विज्ञान संघटना, केरळ शास्त्र साहित्य परिषद अशा लोकांसाठी विज्ञान ही भूमिका मांडणार्या संघटना जन्माला आल्या.विविध विषयांच्या अंगाने सुरू असलेल्या चळवळीमुळे मानवता आणि मानवते पुढील आव्हाने यावर साहित्यिक, नाटककार,चित्रकार अशा कलाकारांचे लक्ष केंद्रीत झाले.त्यामुळे सुधीर पटवर्धन यांच्या सारख्या अनेक चित्रकारांनी मानव केंद्री विषय निवडले.चित्रकलेच्या माध्यमातून मानवाच्या पिडा व्यक्त होऊ लागल्या.मानवतेचं संवर्धन,जतन हा कलेचा प्रमुख विषय झाला.मर्ढेकरांच्या पासून नामदेव ढसाळ,नारायण सुर्वे यांचे पर्यंत या सर्वांच्या काव्यावर कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो.यातील सर्व लोकांनाच मार्क्सवाद मान्य होता,कम्युनिस्ट मान्य होते असा याचा अर्थ नाही पण विविध क्षेत्रातील चळवळीमुळे सर्वसामान्य जनता राजकारणाच्या समाजकारणाच्या,साहित्याच्या आणि इतिहासाच्या केंद्रस्थानी राहिली.स्त्री मुक्ती चळवळीमुळे स्त्रीयांचे प्रश्न,स्त्री अस्मिता,स्त्रीयांच्या लैंगिक भावभावना,स्त्री -पुरुष संबंध त्यांचे कामजीवन त्यातील शोषण या अंगाने साहित्याची निर्मिती झाली.विठ्ठल प्रभू यांनी त्या काळात अत्यंत धाडसाने काम जीवन विषयक अशास्त्रीय समज,गैरसमज,अंधश्रद्धा,पुरुषी दृष्टीकोन उघड करणारी पुस्तके लिहून शास्त्रीय कामजीवनाचे धडे दिले.के.मो. फडके यांनी प्रथमच मराठी भाषेत अल्बर्ट एलिस यांच्या तर्कसंगत भावनात्मक व्यवहार थेरेपी (आरईबीटी) चा प्रचार,प्रसार केला. कम्युनिस्ट आंदोलनाचे परिणाम विविध विचारसारणीवर होत होते,विवेकनिष्ट विचारांना चालना मिळत होती. भूमिहीन लोकांच्या आंदोलनाचा परिणाम होऊन विनोबा भावें यांनी सुद्धा भूदान चळवळ उभी केली.
आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानामुळे सुद्धा मानवता नष्ट होते आहे त्यामुळे माणूस सत्वहीन जगत आहे,आत्मकेंद्री होत आहे असे म्हंटले जाते.बर्याच अंशी बरोबर आहे.पण हे एकमेव कारण नाही.तर या सोबत माझ्या मते एक महत्वाचे कारण मी अनुभवले आहे. गेल्या ३० वर्षात अगदी कष्टकरी पालकांपासून अनेकांची पाल्य इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकत आहेत.
याच प्रमुख कारण म्हणजे भाषावर प्रांतरचेने नुसार महाराष्ट्र स्थापन झाला खरा.आपल्या राज्याची मराठी ही राज्य भाषा झाली खरी पण ती अर्थ व्यवहारची,रोजगारची,बँक व्यवहारची ऊच्य शिक्षणाची, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा होऊ शकली नाही.
महाराष्ट्रातील सारेआर्थिकव्यवहार,व्यापार,उद्योग एकतर मारवाडी,गुजराथी भाषेत किंवा इंग्रजीत होत असतात आणि ही स्थिती मुंबई पुरता नसून गाव पातळीवर सुद्धा हीच स्थिती आहे. उच्य शिक्षण इंग्रजी भाषेतच मिळते त्यामुळे आपल्या पाल्याची हितासाठी पालकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांना प्रवेश दिला.त्यामुळे आपोआपच या मुलांचा मराठी भाषेशी असलेला संबंध पार तुटला,फक्त घरात बोलण्याची भाषा म्हणून माय मराठीचे अस्तित्व आहे आणि याचा मी नित्य अनुभव घेत असतो.
हा अनुभव अगदी १९९० च्या पासून लोकविज्ञान चळवळीत मुलांचे शिबीर घेतांना माला आला.आम्हाला मराठी समजत नाही अशी तक्रार मूल करीत असत.या पेक्षा जास्त विदारक अनुभव या पाच सहवर्षात येत आहे.आजी,आजोबा म्हणून आमच्या नातवांचा आम्ही अनुभव घेत आहोत.आपण साधे घरात बोलतांना त्यांना अगदी साधे मराठी शब्द जड जातात व याचा अर्थ काय म्हणून विचारतात.त्यामुळे मराठी साहित्य,कला यांचा आस्वाद घेणे ही खूपच दूरची गोष्ट आहे.त्यामुळे भविपिढी कडून आज तारी मराठी माणसाचे सत्व,मराठी माणसाचे मराठीपण,मराठी माणसाची ओळख या विषयी अपेक्षा बाळगणे हे मृगजळच्या मागे धावण्यासारखे आहे.
मराठी भाषिकांपुरताच ही समस्या नसून इंग्रजी मुळे सर्व भाषांना व भाषिकांना हा प्रश्न त्रस्त करणार आहे.
आपली मातृभाषा नीट येत नाही आणि इंग्रजी सुद्धा अभ्यास क्रमापूरताच येत असल्याने सारा हिंदुस्तानी
समाज,व्यक्ती आपल्या संस्कृतिक ठेव्या पासून,मूल्यांपासून दूर जात आहे.भाषा येत नसल्याने वाचनाची गोडी निर्माण होत नाही दुसर्या बाजूला उद्धट,उपमर्द करणारी भांडखोर,युद्धखोर,मार झोडीची प्रवृत्ती शिकवणारे मोबाइल खेळ,कार्टून्स,टॉलीवूड,बॉलीवूड,हॉलीवूड,दक्षिण्यात मारधडीचे जे चित्रपट आहेत त्यामुळे मुलांमधील संवेदनशील वृत्ती नष्ट होत आहे.
या परिणामी आजचा विद्यार्थी,युवक दिशाहीन,उद्दीष्टहीन,अस्मिताहीन,स्व-केंद्री झालेला दिसत आहे.एकुणात हास्य जत्रेतील शक्तिमान,सुपर पॉवर दत्तू हा आजच्या पिढीचा प्रतिनिधी आहे.या स्थितीकडे कडे आजचे शासक पद्धतशीर दुर्लक्ष करीत आहेत.ज्यांना सामाजिक भान आहे,मानवकेंद्री संकृतीचे भान असलेल्या कम्युनिस्ट,समाजवादी,आंबेडकरी,आदिवासी,स्त्रीमुक्तीवादी चळवळी आजच्या या कठीण परिस्थितीत सुद्धा नेटाने आपल्या चळवळी पुढे नेत अहते.चळवळ टिकवून धरली आहे.
लोकशाहीचा संकोच होत असलेल्या या काळातही अगदी निराशाजनक परिस्थिति नाही विविध स्थरावर
चळवळी होत आहेत.या चळवळी आज जरी सशक्त दिसत नसल्या तरी त्यांच्या हातून मराठी माणसाचे सत्व,मराठी माणसाचे मराठीपण,मराठी माणसाची ओळख,त्याची संकृती,कला याची जपणूक होऊ शकेल आणि तशी अपेक्षा बाळगावी असे मला वाटते.
-------------------------------------)(------------------------------------------















